पुरंदर रिपोर्टर Live
यवत | प्रतिनिधी
मुसळधार पावसात वीज अंगावर कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील बोरीपार्थी गावातशुक्रवारी ( दिनांक १३ ) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
संजय जगन्नाथ जगताप (वय-५०, मगरमाळा, बोरीपार्धी ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय जगताप हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते नेहमीप्रमाणे आज शुक्रवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यांच्या बोरीपार्धी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर १६८ /२ मधील शेतात वांग्याच्या रोपांची लागवड करण्याचे काम सुरु होते.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमरास अचानक मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यावेळी संजय जगताप यांनी कामगारांची सुट्टी केली. त्यांचा मुलगा अभिजित हे कामगारांना सोडविण्यासाठी गेले होते. तर अभिजित कामगारांना सोडवून माघारी येईपर्यंत संजय जगताप हे स्वत: शेतात वांग्याच्या रोपांची लागवड करीत होते.
दरम्यान, संजय जगताप यांचा मुलगा अभिजीत हे कामगारांना सोडवून माघारी आले होते. तेव्हा वडील शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले होते. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडनवर व अभिजित यांनी त्यांना त्वरित एका खाजगी दवाखान्यात
उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे घोषित केले.
पुणे जिल्ह्यात पहिला बळी
शेतात काम करताना संजय जगताप यांचा अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे. तर वीज अंगावर कोसळून हा जिल्ह्यातील पहिला बळी गेला आहे.
0 Comments